ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा चंद्रपुरात निषेध

0
130

महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेतर्फे निवेदन

चंद्रपूर, ३१ : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्‍त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. कायद्यानुसार गुन्हेगाराला कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावे, अशा घटना बघता चंद्रपूर महानगरपालिकेत सशस्त्र पोलीसांचा कायम बंदोबस्त ठेवण्यात यावा, या मागणीचे निवेदन मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे व इतर अधिकाऱ्यांद्वारे आयुक्त राजेश मोहिते व महापौर राखी कंचर्लावार यांना देण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्‍त कल्पिता पिंपळे, माजीवाडा प्रभाग या सायंकाळी 5.30 च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करीत होत्या. तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातगाडी फेरीवाल्याने तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून सहाय्यक आयुक्‍त व त्यांचा अंगरक्षक या दोघांनाही गंभीर दुखापत केली. शासकीय कर्तव्यावर असतांना एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे, ही नक्कीच चिंताजनक बाब असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण, पती-पत्नी एकत्रीकरणाला नविन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल ? याचा सुध्दा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे, असे अधिकारी संघटनेने म्हटले आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कर्तव्य बजावत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्याचा संघटीत निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे, हाच यावर योग्य उपाय आहे. त्यामुळे अटक केलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून, कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, याकरिता महानगरपालिकेत ठराव घेण्यात यावा. तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना वारंवार अशा परिस्थितीचा सामना विविध कार्यवाही दरम्यान करावा लागतो. यासाठी २ पुरुष व २ महिला सशस्त्र पोलीसांचा कायम बंदोबस्त महानगरपालिकेत ठेवण्यात यावा, असे निवेदन महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here